आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक

===

आवाज शंभरी शक्ती सोलापुरी’ शंभरहून अधिक प्रकारचे आवाज काढणारा कलाकार!


सोलापूर : प्रत्येक व्यक्तीकडे एक विशिष्ट प्रकारची कला अवगत असते. काही जणांना कला गॉड गिफ्टेड असते तर काहीजण आवडी पोटी ती कला जोपासतात अाणि स्वत:ला त्या कलेत वाहून घेतात. त्या कलेच्या जोरावर ते आपली ओळख निर्माण करत असतात. सोलापूर शहरात देखील असाच एक अवलिया कलाकार आहे ज्याला विविध प्रकारचे आवाज करण्याची जन्मजात कला अवगत आहे. विविध प्रकारच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून लोकांची वाहवा मिळत असतो. स्थानिक ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून विविध प्रकारचे आवाज काढत मनोरंजन करण्याचे ते काम करतात. शहाजी थोरात असं या कलाकाराचे नाव अाहे.

‘शक्ति’ या नावाने सुप्रसिद्ध असलेले शहाजी थोरात भवानी पेठ परिसरात राहतात. सध्या ते कामानिमित्त पुणे येथे स्थायिक आहेत. अवघे तिसरीचे शिक्षण घेतलेले शक्ती यांना आवाज काढण्याची ही कला जन्मजात आहे. पुढे त्यांनी ही कला अधिक विकसित केली. ४५ वर्षीय शक्ती यांचं बालपण मुंबईत गेलं. सुरवातीला मुंबईमधील स्थानिक झपाटा ऑर्केस्ट्रामध्ये बॅकस्टेजला काम करायचे. कलाकारांची कला पाहून ते आपणही अशी मिमिक्री करु शकतो, असा विश्वास एके दिवशी त्यांच्या मनात निर्माण झाला. पुढे आवाज काढण्याचा रियाझ करू लागले.

कलाकार

शक्ती यांना अाज शंभरपेक्षा जास्त विविध प्रकारचे आवाज काढता येतात. तिसरीच्या वर्गात शिकताना असताना शक्ती नाकातून पोलीस गाडीचा सायरन, हेलिकॉप्टर, रेल्वेचा आवाज आणि विविध अभिनेत्याचा आवाज काढू लागले. घरात टीव्ही नसले तरीही सिनेमा पाहण्याची आवड होती. शेजारच्या घरातील टीव्हीचा आधार घेत अभिनेता, राजकारणी यांचा आवाज काढायला ते शिकले. अभिनेत्यांमध्ये प्राण, अमरीश पुरी, मिथुन दा, अमिताभ बच्चन, अजय देवगण, नाना पाटेकर, निळू फुले, जगदीप, अमीन सयानी, शाहरुख खान, दादा कोंडके या कलाकारांचे आवाज ते काढतात.

Advertisement -

शक्ती यांना सनई, घुंगरू या वाद्यांचा आवाज, सह्याद्रीच्या डोंगररांगात धुंवाधार बरसणारा पाऊस, जोरात वाहणारा बेफान वारा, कड्यावरुन कोसळणाऱ्या धबधब्यांचा धीरगंभीर आवाज, ओढ्यानाल्यांचा खळखळाट, बिबट्याच्या डरकाळ्या, मोर, पोपट, चिमणी, भारद्वाज या पक्ष्यांचे मंजूळ आवाज असे निसर्ग संगीताचे हुबेहूब आवाज तोंडने काढण्याची चमत्कारिक कला त्यांना अवगत अाहे. अाज ते आपल्या कॉमिक कलेसाठी ओळखले जातात. त्यांची कॉमेडी ऐकून पैसा वसूल करणारे बरेच चाहते देखील आहे. इतर कलाकारांचा हुबेहुब आवाज काढणारा कलाकार म्हणून शक्ती यांना वेगळी ओळख मिळाली आहे.

भारतातील सर्वच नृत्यप्रकारात पारंगत

शक्ती हे भारतातील सर्वच नृत्यप्रकारात पारंगत आहेत. अॅक्शन स्टार जॅकी चैनचे ते खूप मोठे फॅन आहेत. जॅकी चैन प्रमाणेच त्यांना वेशभूषा करायला आवडते. तसेच त्यांना विविध प्रकारच्या भाषादेखील बोलायला येतात. इंग्रजी, कन्नड, तेलुगू, मराठी, हिंदी या भाषा ते सफाईदारपणे बोलतात. त्यांनी दादा कोंडके यांचे गुरू सुबल सरकार यांच्याबरोबर फिल्म इंडस्ट्रीत काम केले आहे. तसेच राजू श्रीवास्तव, तारक मेहता का उल्टा चष्मा यामधील सलीम यांच्यासोबत कला सादर केली आहे. स्थानिक ऑर्केस्ट्रा मधून त्यांनी आपली कला सादर करत रोजीरोटीचा प्रश्न सोडवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here