जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

आजारामुळे गणपतीसारखा चेहरा झालेल्या ह्या मुलाचा तिकीट लावून बाजार मांडला गेला होता.


 

५ ऑगस्ट १८६२ या दिवशी अतिशय गोंडस असलेल्या या मुलाचा जन्म झाला. त्याचं एकूणच बाळसं-रुपडं बघताक्षणी सगळे प्रचंड खूष झाले, पण सगळ्यांचा हा आनंद फार दिवस टिकला नाही. दिड वर्षांनंतर त्याच्यात विचित्र अशा जन्मजात आजाराची लक्षणं दिसू लागली. पुढच्याच काही महिन्यात तर त्याच्या शरीरावर अचानक सूज दिसू लागली. बरं ताप नाही, थंडी नाही, खोकला नाही.. त्रास अगदी शून्य पण त्याच्या शरीरावरची सूज दिवसागणिक वाढू लागली..

चारचौघात कौतुकानं आपल्या गोड मुलाला मिरवणारी ‘मेरी जेन’ नावाची त्याची आई आता तिचं हे बाळ कुणाला दिसू नये म्हणून त्याला दुपट्यात बंद करून ठेऊ लागली. सूज ओसरली तर नाहीच पण आता त्वचेवर गाठी येणंही सुरू झालं. लहान-मोठ्या चित्रविचित्र आकाराच्या गाठी. मेरी जेन हैराण झाली. कोणालाही काहीच उपाय सापडेना.

“हा गर्भात असतांना एकदा हैराण करणाऱ्या हत्तीला रागावलं म्हणून हे असं होतंय”, या विचारात मेरी जेन तासनतास काहीबाही विचारात मग्न होऊन जाई. कसंही असो प्रत्येक आईला आपलं बाळ प्राणप्रिय असतं. एव्हाना त्याच्या त्वचेवरची सूज हत्तीसारखी राखाडी रंगात परावर्तित होऊ लागली होती.

हे सगळं असताना दुसऱ्या बाजूला तो तसा संपूर्ण निरोगी होता. त्याला इतर काहीही त्रास होत नव्हता, त्याची शारिरीक-मानसिक वाढ त्याच्या समवयस्क मुलांप्रमाणेच होती, पण वय वाढीस लागलं तसं सूज, त्वचेवरचे फोड वाढू लागले. ते कमी की काय? त्याच्या डोक्याचा आकार अतिरिक्त वाढू लागला. उजवा हात तर इतका मोठा झाला की, त्यानं लिहिणं सोडा दैनंदिन काम करणंही दुरापास्त झालं.

Advertisement -

‘मेरी जेन’ त्याची आई आणि बाबा ‘जोसेफ’ यांना आपलं हे मुल सामान्य आयुष्य व्यतित करू शकणार नाही याची जाणीव झाली. ते ज्या शहरात रहात होते तिथल्या आधुनिक आरोग्य व्यवस्थेची वाणवा बघता आपल्या या मुलासाठी त्यांना काहीतरी निर्णय घेणं आवश्यक होतं. तो आता अकरा वर्षांचा झाला होता. अतिरिक्त वजनाच्या डोक्यामुळं शारीरिक आणि चिंतेनं, त्याहून अधिक मानसिक त्रास ओढणाऱ्या या मुलाचे दुर्दैवाचे फेरे संपले नव्हते. आजारी पडल्याचं निमित्त झालं आणि अहोरात्र काळजी घेणारी, प्रचंड जीव लावणारी, दगडासारखं त्याचं बेढब शरीर फुलाप्रमाणं जपणारी त्याची आई मेरी जेन त्याला कायमचं सोडून देवाघरी गेली.

मुलाची ही अशी अवस्था, त्यात बायकोचं अकाली जाणं यामुळं बाबा तर कोलमडूनच गेला. घरातली स्त्री घरात असतांना ती घरासाठी जे काही करते ते जाणवत नसलं तरी तिच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण होते ती कशानेच भरून काढता येत नाही. या मुलाचं खानपान, न्हाणंधुणं, शि-शू, कपडेलत्ते जोसेफला काहीही माहित नव्हतं. पैसे कमावणं सोपं असतं, पण माणसाची प्रेमानं काळजी घेणं नाही. पुरुषानं स्वत:ला कितीही सामर्थ्यवान मानलं तरी कौटुंबिक जबाबदारी, संसारिक ओझी, नाती पेलण्यात तो अनेकदा कमकुवत ठरतो. तुलनेत स्त्रिया हे सगळं ‘ओझं’ न मानता अधिक सक्षमतेनं अन् कुशलपणं सगळं निभावून नेतात.

गणपती

जोसेफला एकुणच ही तारेवरची कसरत झेपली नाही, अन् त्याच्या नुकतंच पौगंडावस्थेत प्रवेश करणाऱ्या या ओबडधोबड मुलाला चरितार्थासाठी काहीतरी काम करणं भाग पडलं. बरं त्याची एकूणच शारिरीक परिस्थिती बघता त्याला जमेल असं काम मिळणं, त्यानं ते करणं हे सगळं अवघडच होतं.

सरतेशेवटी या मुलाला एका जुनाट इमारतीच्या अंधाऱ्या तळघरात सिगार वळण्याचं काम मिळालं. या कामाचा त्याला एक फायदा तर नक्की झाला तो म्हणजे त्याच्याकडं चमत्कारिकपणे बघणाऱ्या नजरा बंद झाल्या. पण हे सगळं एवढं सोपंही नव्हतं. उजवा हात निकामी असल्यानं त्याचा डावा हात सिगार वळवून दुखून जाई. नाचण्या-बागडण्याच्या वयात दोन घासांसाठी हे लेकरू अक्षरश: काळ्या पाण्याहून कठिण शिक्षा भोगत होतं.

अधूनमधून बायकोच्या विरहामुळं व्याकूळ होणारा प्रेमळ जोसेफ ‘तुझ्यामुळं आमच्या आयुष्याची माती झाली’ म्हणत त्याला मारहाणही करू लागला. शारिरिक आव्हानं, मानसिक आव्हानं, सामाजिक आव्हानं, भावनिक आव्हानं.. किती कैफियत असावी एखाद्या आयुष्याची? बरं ती ही काडीचीही चूक नसताना. शेवटी सगळ्याला कंटाळून ‘असंही मरायचंय तसंही मरायचंय, तर मार खात कशाला जगा?’ म्हणत या लेकरानं घरातून पलायन केलं.

ज्याला निसर्गानं स्वीकारलं नाही, ज्याची आई त्याला सोडून गेली, ज्याच्या बाबानं त्याला कधी प्रेमानं साधा स्पर्श केला नाही, त्याला कोण आसरा देणार? बाहेरचं जग क्रुर असलं तरी ‘बाजार’ हे त्याचं वास्तव आणि ‘पैसा’ हा त्याचा मंत्र असतो. ‘सर्कस’ नावाच्या रंगबेरंगी दुनियेनं त्याचं दोन्ही बाहू पसरवून खुल्या दिलानं स्वागत केलं.

‘चला चला.. त्वरा करा.. लोकांनो हा बघा… एलिफंट मॅन!!’

स्पिकर्सवरनं उद्घोषणा झाल्या. पत्रकं वाटली गेली, जोरदार जाहिराती केल्या गेल्या. ‘अर्ध माणसाचं शरीर आणि हत्तीसारखं मोठं डोकं’ असलेल्या त्याचं प्रचंड गर्दीसमोर कर्णकर्कश्य संगीताच्या साथीत चक्क प्रदर्शन मांडलं गेलं. हजारो चमत्कारिक नजरा पैसे देऊन त्याला गमतीनं बघत होत्या.

या अवस्थेत स्वत:ला फक्त एक सेकंद इमॅजिन करा. ‘होऊनच जाऊदे नियती तुझे खेळ’ म्हणत हे लेकरू जवळपास वर्षभर आपल्या चित्रविचित्र शरीराचं प्रदर्शन त्याहून चित्रविचित्र दुनियेला दाखवत खंबीरपणं उभं राहिलं. तो आता सर्कसमध्ये आकर्षणाचं मुख्य केंद्र झाला होता. एका बाजूला त्याला बघण्याचे दर वाढत राहिले आणि दुसऱ्या बाजूला तो ही आपले धिंडवडे बघत होता. आयुष्याची सतरा वर्षे तसंही तो हेच बघत होता. ही विडंबनाही त्यानं सहन केली. ती ही फक्त वयाच्या सतरा वर्ष या अडनिड टप्प्यावर..

वाढता गल्ला बघता सर्कसवाल्यानं त्याचा म्हणजे ‘एलिफंट मॅन’चा शो आता रस्त्यावरही घेण्याचं ठरवलं. ‘चलो ये भी सहीं’ म्हणत तो यावेळी रस्त्यावरही उभा राहिला. लंडनच्या रस्त्यावर मात्र काही चिकित्सक नजरांनी त्याला संशोधक दृष्टिकोनातून बघितलं. त्याचं हे असं अस्तित्व, त्याची अवस्था याबाबत काही विज्ञानवादी लोकांचं कुतूहल चाळवलं. याच्याबाबत अजूनही काही जाणून घ्यायला हवं असं अनेकांना वाटलं. यातलेच एक होते डाॅ. फ्रेडरिक ट्रेविस.

डाॅक्टर फक्त वृत्तीनं संशोधक नव्हते ते एक सहृदयी व्यक्तीही होते. ’हे सगळं अमानुष होतंय. स्वत:ची थोडी काळजी घे. मदत लागली तर सांग’, एकट्यात गाठून डाॅक्टर हळूच त्याच्या कानात पुटपुटले. आई गेल्यानंतर त्यानं पहिल्यांदाच ‘काळजी’ हा शब्द ऐकला होता. परंतु डाॅक्टरांनी काळजीपोटी दिलेला सल्ला त्याच्यासाठी तितका सोपा नव्हता. तो आता आपल्या मालकाचा गुलाम होता. मालकानं जाहिरातबाजी करत त्याच्यात गुंतवणूक केली होती, तो ती वसूल केल्याशिवाय आता त्याला सोडणार नव्हता.

शेवटी ‘शो बिझनेस’ या गोष्टीला मर्यादा असतात. आता प्रेक्षकही या ‘एलिफंट मॅन’ला पूर्वीसारखा प्रतिसाद देईनासे झाले. गुंतवणूकदारांना मोबदल्याचं गणित पूर्वीसारखं जुळून येत नाहीये असं लक्षात येऊ लागलं. कालपर्यंत पैसे कमवण्यासाठी त्याची बडदास्त ठेवणारे आता त्याला हाडतूड करू लागले..

 

गणपती

शेवटी ‘कुणीतरी आपलं दुःख समजावून घेईल’ या अपेक्षेनं तो एकट्यानंच दूर बेल्जियमला रवाना झाला, पण तिथंही त्याला कुणी भेटलं नाही. परतल्यानंतर मात्र त्याला कधी काळी ‘मदत लागली तर सांग’ म्हणणाऱ्या डाॅ. फ्रेडरिक यांनी शब्द पाळत त्याला आसरा दिला. डाॅक्टरांनी लंडन रुग्णालयात त्याच्या काही तपासण्या केल्या. त्याची अशी अवस्था का आहे? इतकं मोठं डोकं असताना त्याचे खांदे हे वजन पेलतात कसं? त्याचं शरीर गाठींनी का भरलंय? त्याचा उजव्या हाताचं असं कसं झालं? एक ना अनेक प्रश्न होते..

त्याला वैद्यकिय मदतीची नितांत आवश्यकता होती. दिवसागणिक त्याचं शरीर आतून सडत चाललं होतं. डाॅ. फ्रेडरिक यांनी पब्लिक फंडिंगसाठी लोकांना आव्हान केलं. अपेक्षेपेक्षा बरा प्रतिसाद मिळाला. मदतकर्त्यांच्या यादीत वेल्सची राजकुमारी ॲलेक्झांड्रा पासून अनेक लोकांनी दान दिलं. या फंडामधून त्याला आयुष्यात पहिल्यांदाच योग्य वैद्यकिय उपचार मिळत होते, रहायला घर मिळालं होतं, बोलायला थोडेफार मित्र देखील मिळाले होते.

त्याला माणसाप्रमाणं वागणूक मिळायची नुकतीच सुरूवात झाली होती, पण नियतीला हे ही मान्य नव्हतं. काही दिवसातच रुग्णालयातल्या त्याच्या बेडवर तो मृतावस्थेत आढळला.

झोपतांना मान अवघडली आणि डोकं उचलून उशीवर ठेवतांना त्याच्या मणक्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच तो गेला होता. त्याच्या केस स्टडीवरून त्याला न्युरोफायब्रोमॅटोसिस किंवा प्रोटिअस सिंड्रोम हे आजार असावेत असं निदर्शनास आलं. त्याच्यात या दोन्ही विकारांची लक्षणं होती. सत्तावीस वर्षे त्यानं आपलं आयुष्य अक्षरश: ‘भोगलं’, पण चुकून त्याबद्दल कुणाला दोष दिला नाही..

“माझं दिसणं, असणं, जगणं ऑड आहे, पण यात माझा दोष कसा? मला दुषण देणं म्हणजे ज्यानं मला असं बनवलं त्या देवाला दुषण देणं”, आयझॅक वॅट्सचं हे एक वाक्य तो नेहमी बोलायचा. तुम्ही म्हणाल, ”डाॅक्टर आज ही क्रौर्य, उदासिनता, दु:खाने भरलेली गोष्ट का सांगत आहेत? यात तुम्ही नेहमी ज्याची टिमकी वाजवता ती मानवी मुल्ये, विज्ञानवादी दृष्टिकोन कुठे आहेत?

मित्रांनो, मला गेल्या मार्च पासून ”कोविड नेमका जाईल कधी?” हा प्रश्न रोज कुणीतरी विचारतंच. या पार्श्वभूमीवर मला नेहमीच ही ‘एलिफंट मॅन’ची शोकांतिका आठवते, महत्वाची वाटते. इनमिन काही महिने त्याला माणसासारखी वागणूक मिळाली, पण तो या आयुष्याला, जगण्याला, वेदनेला सामोरं गेला. त्याच्यावर पुस्तकं लिहिली गेली, ऐंशीच्या दशकात त्याच्या आयुष्यावर सिनेमाही बनला, लंडनच्या क्विन मेरी विद्यापीठात त्याच्या सांगाड्यावर आजही संशोधन चाललंय, पण त्याच्या सत्तावीस वर्षांच्या आयुष्यात त्यानं अगदी शेवटच्या काही दिवसात विज्ञानवादी दृष्टिकोन, मानवी मुल्ये या गोष्टी पाहिल्या.

जातधर्मलिंगभाषा सगळं बाजूला राहून जातं, जेव्हा एखादं निदान किंवा अनाकलनीय असाध्य अशा पीडादायक मनोशारिरीक अवस्थेस सामोरं जावं लागतं. माणसाचा साधा स्पर्श, थोडी मदत, करुणा या वरवर साध्या वाटणाऱ्या बाबी किती महत्त्वाच्या असतात, हे एलिफंट मॅन नव्हे तर ‘जाॅन मेरिक’ नावाच्या माणसाची ही गोष्ट नक्की शिकवून जाते..

===

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

अभिनेता जॅकी श्रॉफने सांगितले आपल्या मुलाचे सिक्रेट, म्हणाला टायगर…

गंगुबाई काठीयावाडी सिनेमामध्ये या मोठ्या अभिनेत्यांची होणार एंट्री…. वाचा कोन आहे हा अभिनेता..

हि आहे जगातील सर्वांत महाग बिर्याणी, एका हंडीची किंमत तब्बल एवढी…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here